क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती: चाकण नगरपरिषदेत ‘महिला सक्षमीकरणाचा’ जागर; पथनाट्याने वेधले लक्ष
चाकण- स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चाकण नगरपरिषदेत महिला सक्षमीकरणाचा अनोखा संदेश देण्यात आला. ‘चैतन्य प्रेरित ग्रामीण महिला स्वयं सिद्ध संघ’ राजगुरुनगर अंतर्गत चक्रेश्वर विभागातील १०० पेक्षा जास्त बचत गटांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत ‘ती एकटी नाही’ हे पथनाट्य सादर केले. या नाटकातून साध्या गृहिणीचा सक्षम महिलेपर्यंतचा संघर्षमय प्रवास जिवंत करण्यात आला.

‘ती एकटी नाही’ हे पथनाट्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सावित्रीबाईंच्या ओव्यांनी सुरू झालेल्या या नाटकातून एका साध्या गृहिणीचा आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक जागृतीचा प्रवास दर्शविण्यात आला.
कर्तृत्वाची झोप घरात राहणारी महिला बचत गटाच्या माध्यमातून कशी आर्थिकदृष्ट्या सक्षम होते आणि सामाजिक संघटनांच्या नेतृत्वपर्यंत कशी पोचते, याचे वास्तविक चित्रण करण्यात आले.शिक्षणाची जिद्द: वय कितीही असो, शिक्षण कधीच थांबू नये, असा संदेश देण्यात आला. दहावी नंतरचे पुढील शिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांचे आदर्श समोर ठेवण्यात आले.हक्कांची माहिती: केवळ मनोरंजन न करता, शासकीय योजना आणि कायदेशीर हक्कांबद्दलची माहिती महिलांपर्यंत या पथनाट्याच्या माध्यमातून पोहोचवण्यात आल्या
संघाच्या कार्यकर्त्या संघमित्रा शिरसाट आणि खजिनदार शारदा कोरगावकर यांच्या नेतृत्व खाली हे पथनाट्य सादर झाले. मीना कसबे, अनिता चांदणे, भाग्यश्री नंदेश्वर, माया पाटील, प्रियांका मुगदुम, सीमा साळस्कर, रोहिणी कदम यांच्यासह शारदा कोरगावकर आणि संघमित्रा शिरसाट या कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयाने दर्शकांची मने जिंकली.महिलांच्या या सकारात्मक उपक्रमाचे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनीषाताई गोरे मुख्याधिकारी अकुश जाधव आणि नगरसेविकांनी भरभरून कौतुक केले. “बचत गट हे केवळ आर्थिक बचतीचे माध्यम नसून ते महिलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनले आहेत,” असे गौरवोद्गार या प्रसंगी काढण्यात आले. नगरपरिषदेच्या वतीने सर्व सहभागी महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सावित्रीबाई फुले हिंदुस्थानातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे, दरिद्र आणि दलित वर्गातील मुलींचे शिक्षण हे त्यांचे प्रमुख कार्य होते. आजचा हा कार्यक्रम त्यांच्या या महान विरासतीचा योग्य वारसा ठरला.



