बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेबांची उद्या पिंपरखेड येथे भेट !!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब हे उद्या गुरुवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता पिंपरखेड (ता. शिरूर) येथे भेट देणार आहेत.अलीकडेच पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाच्या कुटुंबियांची तसेच ग्रामस्थांची भेट घेऊन साहेब परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. बिबट हल्ल्यात पिंपरखेड, जांबुत परिसरात १५ दिवसात ३ जणांचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातील नागरिकांची वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांपासून कायमची सुटका व्हावी, यासाठी एकनाथजी शिंदे साहेब थेट व प्रभावी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.
या भेटीदरम्यान ते संबंधित वन विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग तसेच स्थानिक ग्रामस्थांसोबत संवाद साधून
बिबट समस्येवर तोडगा काढण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविणे यासंबंधी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार आहेत.पिंपरखेड येथील या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी “या समस्येवर केवळ तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी समाधान व्हावे” अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब स्वतः पुढाकार घेऊन या संवेदनशील विषयावर ठोस निर्णय घेतील, अशी जनतेमध्ये अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

