अजून ‘बॉडी’ स्थापन नाही, तरीही जुन्या कामांचे उद्घाटन कार्यकर्त्यांची नाराजी

चाकण नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 विकासकामांवर श्रेयवादाचा वाद चिघळत असून, विद्यमान नगरसेवकांबरोबरच प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक एका कार्यकर्त्याने सार्वजनिकरित्या व्यक्त केलेल्या नाराजीमुळे हा मुद्दा समोर आला आहे.स्थानिक कार्यकर्त्याचा आरोप असा आहे की, 2015 ते 2020 या काळात याच प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी ठोस विकासकामे केली नाहीत तसेच 2020 ते 2025 दरम्यान नगरपरिषदेत प्रशासकीय कारभार सुरू असताना झालेल्या अनेक कामांसाठीही त्याच नगरसेवकांकडून आज उद्घाटनाचा दिखावा केला जात आहे. त्यांच्या मते, “त्या काळात कामे रखडली; आज जे काही कामे दिसत आहेत, ती प्रशासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहेत आणि त्यासाठीचे सर्व कागदपत्रीय व्यवहार मी स्वतः पाठपुरावा करून पूर्ण केले.”कार्यकर्त्याच्या सांगण्यानुसार, नगरपरिषदेत नवे प्रतिनिधी नुकतेच निवडून आले असले तरी अद्याप अधिकृतपणे ‘बॉडी’ स्थापन झालेली नाही स्थायी समित्या व इतर समित्यांची रचना प्रलंबित असतानाच, काही जुन्या प्रलंबित
कामांचे पुन्हा उद्घाटन करून राजकीय पातळीवर श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. “अजून अधिकृत जबाबदारी हाती आलेली नसताना हे नारळ फोडणे सुरू झाले आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.तोच पुढे म्हणतो, “मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून गेल्या काही वर्षांत प्रशासनाकडे वारंवार मागण्या मांडल्या, पाठपुरावा केला आणि काही महत्त्वाची लहान-मोठी कामे मंजूर करून घेण्यास यशही मिळवले. या सर्व कामांचा उगम प्रशासकीय नोंदींमध्ये स्पष्ट आहे; तरीही उद्घाटनाच्या वेळी कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देऊन केवळ निवडून आलेल्या प्रतिनिधींना पुढे केले जाते.”या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधिल विकासकामांच्या खरी जबाबदारी आणि राजकीय श्रेय यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांमध्येही असा सूर ऐकायला मिळतो की, “काम कोण करतो आणि नारळ कोण फोडतो, हे सगळ्यांना माहीत आहे,” पण तरीही अधिकृत पातळीवर श्रेयाचे राजकारणच रंगताना दिसते.राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, ग्रामीण व लहान नगरपरिषदांमध्ये प्रशासन, स्थानिक कार्यकर्ते आणि निवडून आलेल्या प्रतिनिधी यांच्यात सुसंवादाचा अभाव दिसत असतो. यामुळे विकासकामांचा वेग कमी होतो, तर काम पूर्ण झाल्यावर श्रेयासाठी होणारे राजकारण वाढते. प्रभाग पातळीवर, जलवाहिनी दुरुस्ती, रस्त्यांची डांबरीकरणे, गटारी, स्ट्रीटलाइट, सार्वजनिक सोयी-सुविधा अशा रोजच्या जीवनाला थेट स्पर्श करणाऱ्या कामांवरूनच निवडणुकांचा कल ठरतो.

नगरपरिषदेत नवी ‘बॉडी’ स्थापन होण्याआधी असा कार्यक्रम घेणे कितपत योग्य?प्रभागातील काही नागरिकांचे म्हणणे आहे, “खरा विकास म्हणजे वेळेत आणि दर्जेदार कामे पूर्ण होणे; उद्घाटनाचे फोटो आणि नारळ फोडण्यापेक्षा कामाची सातत्याने देखभाल महत्त्वाची आहे. कार्यकर्ते आणि नागरिक प्रत्यक्ष मैदानात असतात; त्यामुळे त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे.”दरम्यान, संबंधित नगरसेवकांचा अधिकृत प्रतिसाद अद्याप समोर आलेला नसला तरी, प्रभाग क्रमांक एकातील विकासकामांवर पारदर्शक आढावा घेऊन खरी कामगिरी सार्वजनिक करावी अशी मागणी नागरिक व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींमध्ये सातत्याने पुढे येत आहे. या घडामोडींमुळे येणाऱ्या काळात चाकण नगरपरिषद क्षेत्रात विकास विरुद्ध श्रेयवाद हा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
